
नांदेड| शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत “ऑपरेशन क्रॅकडाउन” अंतर्गत गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत 9 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 02 मे 2026 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे अरुणोदय नगर परिसरात “आंदर-बाहर” जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. या कारवाईत आरोपींकडून रोख रक्कम, जुगार साहित्य, मोबाईल फोन तसेच दुचाकी वाहने असा एकूण ₹4,52,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


सदर प्रकरणात महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हा क्रमांक 239/2026 नोंदविण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष तांबे, गुन्हे शोध पथकाचे पो.उप.नि. विनोद देशमुख व त्यांच्या पथकाने सहभाग घेतला.


ही कारवाई अविनाश कुमार (पोलीस अधीक्षक, नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून संबंधित अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले आहे. नांदेड पोलिसांकडून अवैध धंद्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येत असून नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


