
नांदेड| विभागातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. South Central Railway मार्फत विविध विशेष गाड्यांचे नियमितीकरण, नवीन गाड्यांची सुरूवात तसेच विद्यमान गाड्यांचा विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाच्या मान्यतेनंतर हे बदल लागू करण्यात येत आहेत.


प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून नांदेड – तिरुचानूर – नांदेड (17633/17634) ही साप्ताहिक एक्सप्रेस 09 मे 2026 पासून सुरू होणार आहे. तसेच जालना – तिरुचानूर – जालना (17637/17638) ही साप्ताहिक एक्सप्रेस 11 मे 2026 पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या दोन्ही गाड्या महत्त्वाच्या स्थानकांमार्गे धावणार असून मराठवाडा व आंध्रप्रदेश यांदरम्यानची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे.


याशिवाय, पूर्वी स्पेशल म्हणून धावणारी पूर्णा – जालना – नांदेड (77623/77624) डेमू पॅसेंजर सेवा आता नियमित करण्यात आली असून 04 मे 2026 पासून दररोज धावणार आहे. या निर्णयामुळे स्थानिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.


दरम्यान, नांदेड – रायचूर – परभणी एक्सप्रेस (17663/17664) या गाडीचा जालना पर्यंत विस्तार करण्यात आला आहे. हा विस्तार 05 मे 2026 पासून लागू होणार असून परभणी, सेलू व परतूर मार्गावरील प्रवाशांना थेट रेल्वे सुविधा उपलब्ध होणार आहे. मात्र, या बदलांच्या पार्श्वभूमीवर परभणी – नांदेड पॅसेंजर (57659) ही गाडी रद्द करण्यात आली आहे.


या निर्णयामुळे नांदेडसह लातूर, परभणी, हिंगोली परिसरातील प्रवाशांसाठी रेल्वे प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
