
हिमायतनगर, अनिल मादसवार| आदिलाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेस मध्ये प्रचंड गर्दी झाल्याने हिमायतनगर रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा मोठा गोंधळ उडाला. सर्व डबे हाऊसफुल झाल्यामुळे हिमायतनगरहून नांदेड व पुढील गावांकडे जाणाऱ्या अनेक प्रवाशांना गाडीत चढता आले नाही.


दरम्यान, रेल्वेने स्थानकावर अपेक्षेपेक्षा कमी वेळ थांबा घेतल्याने परिस्थिती अधिकच बिघडली. तिकीट काढूनही प्रवास करता न आल्यामुळे अनेक प्रवाशांना स्टेशनवरच थांबावे लागले. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.



गोंधळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी तिकीटाचे पैसे परत मागितले असता सुरुवातीला स्टेशन मास्टरने टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, प्रवाशांचा रोष वाढत असल्याचे पाहून अखेरीस तिकीटाची रक्कम परत करण्यात आली.


याबाबत माहिती देताना मंगरूळ येथील प्रवासी गंगाधर पांडलवाड यांनी सांगितले की, “तिकीट असूनही प्रवास करता आला नाही, त्यामुळे मोठी गैरसोय झाली.” या प्रकारामुळे रेल्वे प्रशासनाने गर्दी नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, लग्नसराई व उन्हाळी सुट्ट्यांची अडचण लक्षात घेता ज्यादा गाड्या सोडाव्यात किंवा अधिकचे डबे लावावे आणि प्रवाशांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे.


