
अधिकृत ठेकेदारांना अडचणीत आणण्याचे व बेकायदा लोकांना अभय देण्याचा प्रताप सुरु..!


हिमायतनगर (अनिल मादसवार) तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावर सुरू असलेल्या अवैध रेती आणि गायरान जमीन, तलावातून केल्या जाणाऱ्या मुरूम उत्खननाने अक्षरशः उच्छाद मांडला असून कोठा, धानोरा, वारंगटाकळी, विरसणी, खडकी, पिचोंडी परिसरात रात्रंदिवस मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडपणे चालू आहे. विशेष म्हणजे कोणताही परवाना किंवा लिलाव नसताना हा व्यवसाय सुरू असल्याने महसूल व पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


स्थानिक पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दररोज डझनावारी ट्रॅक्टर व हायवा वाहनांद्वारे रेती-मुरूमाची खुलेआम ने-आण होत असूनही संबंधित यंत्रणा ‘बघ्याची भूमिका’ घेत असल्याचा आरोप आहे. पोलीस व महसूलच्या या बोटचेपी कारभारामुळे शासनाचा लाखो-कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याची चर्चा रंगली आहे.


एकीकडे दिघी व कामारी येथील रेती घाटांचे नियमांनुसार लिलाव होऊनही त्या अधिकृत ठेकेदारांना अडचणीत आणले जात असल्याची माहिती समोर येत आहे. “ज्यांच्याकडे परवाना आहे त्यांनाच वेळेचे कारण दाखऊन त्रास दिला जातो आहे. आणि बेकायदेशीर उत्खनन व वाहतुकीचा गोरखधंदा करतात त्यांच काम मात्र पोलिसांच्या आशीर्वादाने जोमात,” चालत अशी खंत एका वाहनधारकाने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.


या सर्व प्रकारामुळे प्रशासनाच्या संगनमताचीही चर्चा सुरू झाली असून, पर्यावरणाचा ऱ्हास, नदीपात्राची हानी आणि कायद्याचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. संबंधित विभागांनी तात्काळ अवैध वाहतूक व उत्खनन करणाऱ्यावर कारवाई करून या ‘रेती माफिया’ना आळा घालावा, आणि सर्वसामान्य नागरिक घरकुल धारकांना शासनाच्या मोफत रेती योजनेचा लाभ मिळून द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.
एकीकडे ‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’, दुसरीकडे हिमायतनगरात बेकायदेशीर धंद्यांना मोकळे रान? – जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या “ऑपरेशन फ्लॅश आऊट” मोहिमेत जिल्हाभर अवैध धंद्यांवर धडक कारवाई होत असताना, हिमायतनगरमध्ये मात्र चित्र पूर्णपणे उलट असल्याचे दिसून येत आहे. शहर व तालुक्यात सुरू असलेल्या विविध बेकायदेशीर धंद्यांकडे स्थानिक पोलीस प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
रेती-मुरूम उत्खनन, अवैध वाहतूक, मटका-जुगार, गुटखा, रेशन, यांसारखे प्रकार खुलेआम सुरू असूनही ठोस कारवाईचा अभाव दिसून येत आहे. “जिल्ह्यात मोहीम कडक, पण हिमायतनगरात मात्र मोकळीक,” अशी टीका स्थानिकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हिमायतनगरच्या कारभाराची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, तसेच सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांवर तातडीने लगाम घालावा, अशी मागणी जोर धरत आहे.
“नदीकाठावरील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध रेती साठवून गरजूंना अव्वाच्या सव्वा दराने विक्री केली जात आहे. या गोरखधंद्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून तात्काळ कठोर कारवाई करून या माफियांना आळा घालणे अत्यंत गरजेचे आहे,” असे मत पर्यावरणप्रेमींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केले.
