
नांदेड | नांदेड जिल्ह्यात निर्माण झालेल्या तीव्र चलन टंचाईच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी रिजर्व बँक ऑफ इंडिया च्या प्रादेशिक संचालकांना तातडीचे पत्र पाठवून पुरेशा चलन पुरवठ्याची मागणी केली आहे.


जिल्ह्यात सध्या लग्नसराईचा हंगाम आणि शेतकऱ्यांची पेरणीपूर्व तयारी सुरू असताना रोख रकमेची मोठी टंचाई जाणवत आहे. या गंभीर परिस्थितीबाबत खासदार चव्हाण यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.


पत्रात नमूद केल्याप्रमाणे, नांदेड जिल्ह्यासाठी मुख्य ‘करन्सी चेस्ट’ म्हणून काम करणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया च्या शिवाजीनगर शाखेतील स्थिती चिंताजनक आहे. 450 कोटी रुपयांची क्षमता असलेल्या या चेस्टमध्ये सध्या अत्यल्प रक्कम शिल्लक असून, उपलब्ध निधी जेमतेम दोन दिवस पुरेल अशी स्थिती आहे.


चलनाच्या कमतरतेचा सर्वाधिक फटका लग्नकार्य करणाऱ्या कुटुंबांना तसेच बियाणे व खते खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे. ग्रामीण भागात अजूनही रोख व्यवहारांना मोठे महत्त्व असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.


नांदेड करन्सी चेस्टकडून सातत्याने मागणी करूनही नागपूर विभागाकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली आहे.
या पार्श्वभूमीवर, पुढील सात दिवसांची गरज लक्षात घेऊन किमान 200 कोटी रुपयांचे चलन तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी खासदार चव्हाण यांनी रिझर्व्ह बँकेकडे केली आहे. या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा निघण्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
