
हिमायतनगर| तालुक्यातील कारला येथे बेलदार–गवंडी समाजाच्या वतीने आयोजित सामूहिक विवाह मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात एकूण ७ जोडपी विवाहबद्ध झाली असून, साधेपणा आणि सामाजिक एकतेचा आदर्श घालून देणारा हा सोहळा ठरला.



या प्रसंगी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, “बदलत्या काळात वाढत्या विवाह खर्चाला फाटा देत बेलदार समाजाने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे. अशा सामूहिक विवाहाचा आदर्श इतर समाजांनीही घ्यावा,” असे आवाहन केले.



गेल्या १६ वर्षांपासून कारला येथे हा उपक्रम सातत्याने राबवला जात असून, शेकडो वधू-वरांचे विवाह या माध्यमातून पार पडले आहेत. विशेष म्हणजे, या सोहळ्यात गावातील सर्व धर्म व जातींच्या नागरिकांनी एकत्र येत एकजुटीचे दर्शन घडवले.



यंदाच्या मेळाव्यात रासमवाड, मुढेवाड, ढाणके, आचमवाड, एटलेवाड, यमजलवाड आणि चिंतलवाड या कुटुंबांतील 7 वधू-वरांचे विवाह लावण्यात आले. सोहळा यशस्वी करण्यासाठी कारला तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष डॉ. अ. गफार, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर घोडके, पत्रकार सोपान बोपीलवार, रामेश्वर यमजलवाड, अशोक आचेमवाड, गजानन चव्हाण, केशव रासमवाड, राजू ढाणके, शिवाजी यटलेवाड, जनार्धन मुडेवाड आदींसह गावातील नागरिकांनी परिश्रम घेतले.



या विवाह सोहळ्यास हजारो नागरिक उपस्थित होते. नगराध्यक्ष रफिक शेख, पत्रकार प्रल्हाद आयनेले, भाजपा जिल्हा सरचिटणीस गजानन तुप्तेवार, शिवसेना नेते वळसे पाटील, विकास पाटील, साहेबराव घोडगे, जनार्दन ताडेवार यांसह विविध मान्यवरांनी उपस्थित राहून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. साधेपणा, खर्चिक प्रथांना आळा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा हा सामूहिक विवाह मेळावा समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.
