तिरुपती–अकोला साप्ताहिक एक्सप्रेस सुरू; विदर्भ-माराठवाड्याला मोठा दिलासा

नांदेड | महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधील रेल्वे संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी रेल्वे बोर्डाने गाडी क्रमांक 17429/17430 तिरुपती–अकोला–तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. विद्यमान विशेष गाडीच्या ऐवजी ही सेवा आता नियमित साप्ताहिक स्वरूपात धावणार आहे.

गाडी क्रमांक 17430 अकोला–तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस प्रत्येक रविवारी अकोला येथून सकाळी 08:10 वाजता सुटेल आणि सोमवार रोजी सकाळी 08:30 वाजता तिरुपती येथे पोहोचेल. ही सेवा 3 मे 2026 पासून सुरू होणार आहे.

तर गाडी क्रमांक 17429 तिरुपती–अकोला साप्ताहिक एक्सप्रेस प्रत्येक शुक्रवारी तिरुपती येथून दुपारी 12:25 वाजता सुटून शनिवार रोजी दुपारी 02:00 वाजता अकोला येथे पोहोचेल. ही सेवा 8 मे 2026 पासून सुरू होणार आहे. या गाडीचे प्रमुख थांबे वाशिम, हिंगोली, बासमत, पूर्णा, हजूर साहेब नांदेड, धर्माबाद, बासर, काचिगुडा, कर्नूल टाउन आदी स्थानकांवर असतील.

या नव्या साप्ताहिक सेवेच्या माध्यमातून विदर्भ व मराठवाडा भागातील प्रवाशांना तिरुपती या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राशी थेट रेल्वे संपर्क मिळणार आहे. यात्रेकरू, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत सोयीची ठरणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

अकोला, वाशिम, हिंगोली, बासमत आणि नांदेड परिसरातील प्रवाशांना या सेवेचा विशेष लाभ होणार असून, या मार्गावरील प्रवास अधिक सुलभ होणार आहे. प्रवाशांनी या नव्या रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!