नांदेड एज्युकेशन सोसायटी व दयानंद शिक्षण संस्थेमध्ये शैक्षणिक करार

नांदेड | मराठवाड्यातील शिक्षण क्षेत्राला नवे बळ देणारा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणून नांदेड एज्युकेशन सोसायटी आणि लातूर येथील दयानंद शिक्षण संस्था यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.

स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीने महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात विशेष ओळख निर्माण केली आहे. आता या संस्थेने लातूरमधील नामांकित दयानंद शिक्षण संस्थेसोबत भागीदारी करत विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या करारामुळे सायन्स महाविद्यालयातील इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे. दोन्ही संस्थांमध्ये अध्यापन पद्धती, शैक्षणिक उपक्रम आणि अनुभवांची देवाणघेवाण होणार आहे.

सोमवारी नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या प्राध्यापकांनी लातूर येथील दयानंद शिक्षण संस्थेला भेट देऊन त्यांच्या शैक्षणिक पद्धतींचा आढावा घेतला. यावेळी विविध स्पर्धा परीक्षांसाठी (JEE, NEET, CET) दिली जाणारी तयारी, स्टडी मटेरियल, तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा यांची माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे, या कराराअंतर्गत दयानंद शिक्षण संस्थेकडून सायन्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाइन वर्गांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील यांनी सांगितले की, संस्थापक स्वामी रामानंद तीर्थ यांच्या विचारांनुसार गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी देण्याचा वारसा पुढे नेला जात आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल आणि दोन्ही संस्थांतील शैक्षणिक संबंध अधिक मजबूत होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!