
नांदेड| राज्यातील आरोग्य सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि नागरिकांना अधिक परिणामकारक सेवा मिळावी यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आरोग्य उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत कार्यरत असलेल्या सर्व आरोग्य समित्यांचे तातडीने पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.


ग्रामीण व शहरी भागात कार्यरत असलेल्या रुग्ण कल्याण समिती (RKS), जन आरोग्य समिती (JAS), महिला आरोग्य समिती (MAS) तसेच ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती (VHNSC) या समित्या नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, अनेक ठिकाणी या समित्या निष्क्रिय झाल्याचे दिसून येत असल्याने त्यांच्या पुनर्रचनेचा निर्णय घेण्यात आला आहे.


ग्रामीण भागात VHNSC मार्फत स्वच्छता, पोषण, पाणीपुरवठा आणि प्राथमिक आरोग्य सेवा यावर लक्ष दिले जाते, तर शहरी भागात MAS ही महिला-केंद्रित समिती झोपडपट्टी व नागरी भागातील आरोग्यविषयक प्रश्न हाताळते. याशिवाय JAS आणि RKS या समित्या रुग्णालयातील सेवा, निधीचा वापर आणि रुग्णकेंद्रित सुविधा यावर देखरेख ठेवतात.


आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, “आरोग्य व्यवस्थेचा पाया मजबूत करण्यासाठी लोकसहभाग अत्यावश्यक आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतल्यास आरोग्य सेवांमधील त्रुटी दूर करून सेवा अधिक प्रभावी करता येईल.”



याच अनुषंगाने समित्यांमध्ये सरपंच, नगरसेवक, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, आरोग्यदूत, तसेच समाजातील विविध घटकांचा समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. समित्यांनी नियमित बैठका घेऊन स्थानिक समस्यांवर कृती आराखडे तयार करणे, सदस्यांचे प्रशिक्षण व विभागांमध्ये समन्वय साधणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, राज्यभरातील लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
