
नांदेड, अनिल मादसवार| खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खतांचा सुरळीत व योग्य दरात पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेड शहरातील कृषी सेवा केंद्रांवर अचानक धडक तपासणी केली. नवीन मोंढा परिसरातील वसुंधरा फर्टीलायझर्स तसेच श्री फर्टीलायझर्स कृषी सेवा केंद्र येथे भेट देत त्यांनी साठा, विक्री प्रक्रिया आणि नोंदींची सखोल पडताळणी केली.


तपासणीदरम्यान विक्रेत्यांचे परवाने, साठा रजिस्टर, ई-पॉस मशीन यांची पाहणी करण्यात आली. प्रत्यक्ष साठा आणि ई-पॉसवरील आकडे जुळतात का, याची खात्री करण्यात आली. तसेच खत विक्रीची बिले तपासून शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष खरेदी केली आहे का, याचीही पडताळणी करण्यात आली.


जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश देत सांगितले की, ई-पॉस मशीनशिवाय खत विक्री करू नये, कृत्रिम टंचाई निर्माण करू नये आणि साठेबाजी टाळावी. युरिया व डीएपी खतांच्या विक्रीवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देत खरीप हंगामपूर्व सर्व कृषी केंद्रांची १०० टक्के तपासणी पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.


यावेळी शेतकऱ्यांना दर्जेदार व योग्य दरात कृषी निविष्ठा उपलब्ध होत आहेत का, याचीही पाहणी करण्यात आली. काळाबाजार, लिकिंग पद्धत किंवा जादा दराने विक्री आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, तसेच परवाने निलंबित करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.



“बनावट व निकृष्ट दर्जाच्या कृषी निविष्ठांबाबत शून्य सहनशीलता धोरण राबवले जाईल,” असे स्पष्ट करत कृषी विभागाला गुणवत्ता नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या तपासणीदरम्यान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, कृषी विकास अधिकारी अनिल ऐतवाडे, विभागीय तंत्र अधिकारी बालाजी मुंडे, मोहीम अधिकारी सचिन कपाळे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अमोल पेकम, तालुका निरीक्षक पुनम चातरमल तसेच आरसीएफ व इफकोचे प्रतिनिधी उपस्थित होते.
