
हदगाव,गौतम वाठोरे| हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हदगाव येथे रविवारी (दि. २६ एप्रिल २०२६) भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर समाजातील कुटुंबांवरील विवाह खर्चाचा भार कमी करणे आणि सामाजिक ऐक्य व साधेपणाचा आदर्श निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.


शिवसेना (युती) तर्फे आयोजित या सोहळ्याचे प्रमुख आयोजक हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर आहेत. तामसा रोडवरील रामलीला मैदान येथे दुपारी १ वाजून ०१ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडणार आहे.


या उपक्रमाद्वारे केवळ खर्चात बचत नाही, तर समाजात बंधुभाव, एकात्मता आणि साधेपणाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. “समाजातील कुटुंबांना आधार मिळावा आणि साध्या पद्धतीने विवाह लावून एक आदर्श निर्माण व्हावा,” या भावनेतून शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते नियोजनात सक्रिय सहभागी झाले आहेत.


या मंगलमय सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवदाम्पत्यांना आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन आ. बाबूराव कदम कोहळीकर तसेच आयोजकांनी केले आहे. दरम्यान, या सोहळ्याच्या निमित्ताने हदगाव तालुक्यात उत्साहाचे वातावरण असून विविध स्तरांतून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.


