
आर्थिक संकटातही शिक्षण सुरू ठेवणाऱ्या एमबीबीएस विद्यार्थ्याला समाजाचा हात; निखिल लातूरकर यांच्या पुढाकारातून मदतीची साखळी उभी


नांदेड| जिद्द, मेहनत आणि शिक्षणाची ओढ असेल तर समाजही मदतीचा हात पुढे करतो, याचे प्रेरणादायी उदाहरण नांदेडमध्ये समोर आले आहे. आर्थिक अडचणींशी झुंज देत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या प्रथमेश शशिकांत देशमुख या विद्यार्थ्यास कॅप्टन आशिष दामले यांनी एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली.


ही मदत पत्रकारांच्या उपस्थितीत प्रथमेशचे वडील शशिकांत देशमुख आणि आई सविता देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या उपक्रमासाठी निखिल लातूरकर यांनी पुढाकार घेत विविध स्तरांवर मदतीचे प्रयत्न केले.


प्रथमेश सध्या एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्याने शिक्षणाची वाट सोडलेली नाही. त्याचे वडील पुण्यात डीटीपी ऑपरेटर म्हणून काम करत असताना त्यांना अलीकडेच हृदयविकाराचा झटका येऊन एन्जिओप्लास्टी करावी लागली. त्यामुळे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले.


दरवर्षी सुमारे आठ लाख रुपये खर्च असलेल्या वैद्यकीय शिक्षणासाठी समाजातून मदत उभी करण्यासाठी कृष्णा उमरीकर व रमेश पांडे यांनीही पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक दानशूर व्यक्ती पुढे आल्या आणि मदतीची साखळी तयार झाली.
या मदतीमुळे प्रथमेशच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नांना नवे बळ मिळाले असून समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना वेळेवर मदत मिळाल्यास तेच पुढे समाजासाठी आदर्श ठरू शकतात, असा संदेश या उपक्रमातून दिला गेला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी, संतोष कुलकर्णी, बजरंग शुक्ला, किरण कुलकर्णी, रमेश देवडे, प्रशांत गवळी, प्रल्हाद कांबळे, संतोष क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
