डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक डिजिटल नामफलक प्रकरणी तक्रार; अडथळा आणणाऱ्यांवर कारवाईची मागणी

अडथळा आणणाऱ्यांवर कारवाईची मागणी

नांदेड /किनवट (प्रतिनिधी) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त उभारण्यात आलेल्या डिजिटल नामफलकाच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेतर्फे करण्यात आली आहे.

१४ एप्रिल रोजी किनवट शहरातील मध्यवर्ती ठिकाणी “विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक” या नावाचा आधुनिक डिजिटल नामफलक युवा उद्योजक आशिष शेळके यांनी स्वखर्चातून उभारला. या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत असतानाच काही व्यक्तींनी जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

भिमजयंती निमित्त जयंती मंडळाचे अध्यक्ष आकाश आळणे व सचिव प्रतिकेश ओंकार यांनी चौकाला अधिकृत नामफलक नसल्याची बाब नगरपरिषद व समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींसमोर मांडली होती. त्यानंतर आशिष शेळके यांनी पुढाकार घेत अवघ्या आठ दिवसांत डिजिटल नामफलक तयार करून दिला.

मात्र, नामफलक उभारणीदरम्यान विवेक ओंकार (रा. शिवाजीनगर) व मारोती मुनेश्वर (रा. सिद्धार्थनगर) यांनी वाद निर्माण करत कामात अडथळे आणल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. “परवानगीशिवाय फलक उभारू देणार नाही” तसेच “कायदेशीर कारवाई करू” अशा प्रकारच्या धमक्या दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात स्थानिक आमदार भिमराव केराम यांच्या मध्यस्थीने प्रशासकीय समन्वय साधत अखेर कायदेशीर परवानगी घेऊन नामफलक उभारण्यात आला.

रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा सचिव राजेंद्र शेळके यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषद किनवट येथे दिलेल्या तक्रारीत संबंधित व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी तसेच नामफलकाचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची तातडीने दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन व निदर्शने करण्यात येतील, असा इशाराही राजेंद्र शेळके यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!