
नांदेड (प्रतिनिधी) आगामी राजकीय व संघटनात्मक कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भारतीय जनता पक्षने राज्यभरात मोठे पाऊल उचलत ७४ जिल्हा प्रभारींची नियुक्ती जाहीर केली आहे. ही घोषणा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून, या निर्णयामुळे पक्षाच्या संघटनात्मक कामाला अधिक गती मिळणार असल्याचे मानले जात आहे.


या बदलांमध्ये नांदेड जिल्ह्याचाही समावेश आहे. महानगर प्रभारीपदी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेड उत्तरची जबाबदारी किरण पाटील यांच्याकडे, तर नांदेड दक्षिणची धुरा रेखा कुलकर्णी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे नांदेडमधील भाजप संघटन अधिक मजबूत आणि गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


राज्यभर संघटनात्मक बळकटीसाठी ही मोहीम राबवण्यात आली असून, प्रत्येक जिल्हा प्रभारी आपल्या अनुभव व नेतृत्वाच्या बळावर स्थानिक कार्यकर्त्यांना सोबत घेत पक्षाची पकड अधिक मजबूत करतील, असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. आगामी निवडणुका आणि विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्या महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.


मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्येही बदल करण्यात आले आहेत. परभणी शहरासाठी प्रवीण घुगे, ग्रामीणसाठी संजय केनेकर, हिंगोलीसाठी संजय कौडगे यांची नियुक्ती झाली आहे. जालना महानगरासाठी खासदार अजित गोपछडे तर ग्रामीणसाठी रामराव वडकुते यांची निवड झाली आहे. लातूर शहरासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड तर ग्रामीणसाठी मनोज पांगारकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.


तसेच धाराशिव साठी अर्चना पाटील चाकूरकर, बीड साठी सुनील राणे यांची नियुक्ती झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे शहरासाठी चैतन्यबापू देशमुख, उत्तरसाठी राहुल लोणीकर आणि पश्चिमेसाठी माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.या सर्व नियुक्त्यांमुळे राज्यातील भाजप संघटन अधिक मजबूत होऊन आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
