एसबीआय नांदेडमध्ये महामानवांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी

नांदेड | भारतीय स्टेट बँक (एसबीआय) प्रशासकीय कार्यालय नांदेड तसेच एसबीआय अधिकारी, सेवा, कर्मचारी व ओबीसी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम शिवाजीनगर येथील औद्योगिक शाखेत उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक महाप्रबंधक मयंक चतुर्वेदी होते. प्रमुख वक्ते म्हणून यशवंत महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. अजय गव्हाणे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य प्रबंधक अनुप फाटे (मानव संसाधन), संघटनांचे पदाधिकारी सदाशिव चाळणेवाड, शिल्पा जिंतूरकर, उमेश आडगावकर, किरण कुमार जिंतूरकर, कपिल ढवळे, अतुल पखाण, राहुल खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रस्तावना शिल्पा जिंतूरकर यांनी मांडली. प्रमुख वक्ते प्रा. डॉ. अजय गव्हाणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “महामानवांनी समाजात समता, स्वातंत्र्य आणि बंधुभावाची त्रिसूत्री रुजवली. विज्ञानवादी विचार स्वीकारून अंधश्रद्धेपासून दूर राहणे गरजेचे आहे.” किरण कुमार जिंतूरकर यांनीही सर्वधर्मसमभावाची शिकवण आत्मसात करण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय समारोप करताना मयंक चतुर्वेदी यांनी महामानवांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व महिलांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर नरवाडे यांनी केले. कार्यक्रमास बँकेचे अधिकारी, कर्मचारी व विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील सावंत, अमोल मामुलवार व भगवान गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!