उदगीरमध्ये 18-19 एप्रिलला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन

देशभरातून 2500 पत्रकारांची उपस्थिती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती

उदगीर| अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यांच्या वतीने 44 वे राष्ट्रीय अधिवेशन 18 व 19 एप्रिल 2026 रोजी उदगीर येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी देशभरातून सुमारे 2500 पत्रकार उपस्थित राहणार आहेत.

या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यास एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, राजेंद्र दर्डा उद्घाटन करतील. बाबासाहेब पाटील हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. स्वागताध्यक्ष म्हणून शिवेंद्रसिंहराजे भोसले तर सह-स्वागताध्यक्ष म्हणून आमदार संजय बनसोडे कार्य पाहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. एम. देशमुख तर अधिवेशनाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर असतील.

18 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुलात अधिवेशनाचे उद्घाटन होईल. यापूर्वी शहरातून प्रभात फेरी काढण्यात येणार असून त्यात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असेल. दुपारच्या सत्रात यशस्वी पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच “लोकप्रतिनिधींच्या माध्यमांकडून अपेक्षा” या विषयावर रोहित पवार यांची मुलाखत होणार आहे. रात्री “लोककलेचा जागर” हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

19 एप्रिल रोजी सकाळी सुनील तटकरे यांची मुलाखत घेण्यात येणार आहे. त्यानंतर “माध्यमं सत्ताधाऱ्यांना झुकतं माप देताहेत का?” या विषयावर परिसंवाद होणार आहे. दुपारच्या सत्रात “टीव्हीच्या पडद्यावरची दुनिया” या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली आहे. समारोप सोहळ्यास सुषमा अंधारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून राज्यातील मान्यवर पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. या अधिवेशनास राज्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विजय जोशी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!