विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वंकष उपाययोजना राबवणार- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक संपन्न

नांदेड| नांदेडमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वंकष उपाययोजना राबवणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. अंमली पदार्थ विरोधी समितीच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

नांदेड हे शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र बनले असून राज्यभरातून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात दर्जेदार शिक्षण मिळावे आणि त्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वंकष उपाययोजना करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक पार पडली.

या बैठकीस उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. आश्विनी जगताप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तसेच कोचिंग क्लासेसचे प्रतिनिधी उपस्थित होते. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी क्लासेस परिसरात ‘दामिनी पथक’ व इतर पथकांमार्फत पोलीस गस्त वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देशही पोलीस विभागाला देण्यात आले.

मेडिकल स्टोअर्समध्ये अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री होऊ नये, तसेच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध विक्री टाळावी, याबाबत दुकानदारांनी दक्षता घ्यावी. यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कठोर देखरेख ठेवावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी शिक्षण विभागाने विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबवावेत, अशा सूचना देण्यात आल्या. बैठकीदरम्यान कोचिंग क्लासेसच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या समस्याही ऐकून घेण्यात आल्या. दरम्यान, दि. 20 ते 24 एप्रिल 2026 या कालावधीत दररोज सकाळी 10 ते 12 या वेळेत शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडिअम येथे पालक व विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना सुरक्षित, निरोगी व सकारात्मक वातावरणात शिक्षण मिळावे, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!