
नांदेड (प्रतिनिधी) शहरातील MGR गार्डन फंक्शन हॉल परिसराच्या पाठीमागील इस्लामपुरा भागात साचलेल्या पाण्यात बुडून चार शाळकरी बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून महापालिकेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे दुपारच्या वेळी मुले घराबाहेर खेळण्यासाठी गेली होती. कडाक्याच्या उन्हात खेळताना ही मुले देगलूर नाका परिसरातील नाल्याजवळ पोहोचली. येथे मनपामार्फत सुरू असलेल्या कामासाठी मोठे खड्डे खोदण्यात आले होते. या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने खेळता खेळता ही मुले खड्ड्यात पडली आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला.


या दुर्घटनेत मोहम्मद अदनान मोहम्मद फिरोज (वय 10), मोहम्मद अली मोहम्मद इदरीस (वय 13), सय्यद इरफान सय्यद फिरोज (वय 13), आयान इब्राहिम बागवान (वय 11), रा. इस्लामपुरा, यांचा समावेश असल्याची माहिती आहे. चौघांचे मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेनंतर पालकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. एकाच वेळी चार चिमुकल्यांचा जीव गेल्याने शहरभर हळहळ व्यक्त केली जात आहे.


दरम्यान, नाल्याचे काम सुरू असताना खड्ड्यांभोवती कोणतीही सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नव्हती, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. महापालिकेच्या हलगर्जीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचा संताप व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. अशा धोकादायक ठिकाणांची तात्काळ दखल घेऊन सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


