
जयंतीच्या प्रेरणेने प्रशासनाला जाग


बिलोली| डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर बिलोलीत घडलेली अतिक्रमण हटवण्याची कारवाई ही केवळ प्रशासकीय कृती न राहता, सामाजिक जागृतीचा ठसा उमटवणारी घटना ठरली आहे. भीम अनुयायांच्या ठाम भूमिकेमुळे आणि महिलांच्या तीव्र सहभागामुळे अवघ्या तीन तासांत अतिक्रमण हटवण्यास प्रशासनाला भाग पडले.


जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन नागरिक एकवटले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अतिक्रमणाचा प्रश्न केवळ निवेदनांनी सुटला नव्हता; मात्र यावेळी महिलांनी ठिय्या आंदोलन छेडत प्रशासनावर नैतिक दबाव निर्माण केला. त्यांच्या या शांततामय पण ठाम आंदोलनामुळे प्रशासनाला तात्काळ पावले उचलावी लागली.


शहरातील पोलीस स्टेशन समोरील, तहसील कार्यालयासमोरील, पंचायत समिती गेटसमोरील अतिक्रमण हटवणे पोलीस आणि प्रशासनाला जमले नाही. या पार्श्वभूमीवर आता नागरिकांमध्ये एकच प्रश्न उपस्थित होत आहे— अतिक्रमण हटविण्याचा स्तुत्य उपक्रम घडला. हीच तत्परता शहरातील इतर सर्व सरकारी कार्यालयांच्या गेटसमोर दिसेल का?


या घटनेतून एक गोष्ट प्रकर्षाने पुढे आली आहे की, योग्य काम घडवून आणण्यासाठी महामानवांचे विचार, महिलांचा सहभाग आणि मोठ्या समूहाचा दबाव आवश्यक ठरतो. प्रशासन हे लोकभावना आणि दबाव यांना प्रतिसाद देत असल्याचेही या घटनेतून स्पष्ट झाले.
ज्या विचारांमधून आणि पुढाकारातून ही चळवळ उभी राहिली, ती केवळ एका ठिकाणापुरती मर्यादित न राहता संपूर्ण बिलोली शहरात राबवली जावी, अशी भावना आता नागरिकांमध्ये बळावत आहे. शहरातील सर्वच ठिकाणांवरील अतिक्रमण हटवून सर्वसामान्यांसाठी मोकळी, सुरक्षित व सुलभ सार्वजनिक व्यवस्था निर्माण करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ही कारवाई म्हणजे केवळ अतिक्रमण हटवणे नव्हे, तर एकजुटीने आणि योग्य दिशेने प्रयत्न केल्यास बदल शक्य आहे, याचा जिवंत पुरावा ठरला आहे.
