
मुंबई/नांदेड (प्रतिनिधी) उन्हाळ्याच्या सुट्ट्यांदरम्यान वाढलेल्या प्रवासी गर्दीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हैदराबाद दरम्यान साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी छत्रपती संभाजीनगर – जालना – परभणी – पूर्णा – नांदेड मार्गे धावणार असल्याने मराठवाड्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.



गाडी क्र. 01011 ही साप्ताहिक विशेष रेल्वे 23 एप्रिल ते 9 जुलै 2026 दरम्यान प्रत्येक गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे 00.20 वाजता सुटून त्याच दिवशी सायंकाळी 7.50 वाजता हैदराबाद येथे पोहोचेल.
परतीच्या दिशेने गाडी क्र. 01012 ही विशेष रेल्वे त्याच कालावधीत प्रत्येक गुरुवारी हैदराबाद येथून रात्री 10.00 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) सायंकाळी 8.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचणार आहे.



ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, अंकाई, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, बसर, निजामाबाद, कामारेड्डी, बोलारम आणि सिकंदराबाद या महत्त्वाच्या स्थानकांवर दोन्ही दिशेने थांबेल.


22 डब्यांच्या या विशेष गाडीत एसी, स्लीपर आणि सामान्य श्रेणीचे डबे असतील. या कालावधीत एकूण 24 फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. प्रवाशांनी या विशेष सेवेचा लाभ घ्यावा तसेच आरक्षणासाठी PRS काउंटर किंवा IRCTC संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


