
नकली जर्दा प्रकरणाचा पर्दाफाश; जुगार अड्ड्यावर छापा, 7.37 लाखांचा मुद्देमाल जप्त


नांदेड| नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार विशेष पथकाने जिल्ह्यात धडक कारवाया करत अर्धापुर येथे नकली जर्दा बनविणाऱ्या इसमाचा पर्दाफाश केला, तर देगलूर येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.


अर्धापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदिरानगर परिसरात सय्यद जाकीर ऊर्फ बाबा गुलाम दस्तगीर (वय 40) हा नकली सुगंधित जर्दा तयार करत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला. या वेळी सुगंधित जर्दा, जर्दा तयार करण्याची मशीन, ग्लिसरीन व पॅराफिन असा एकूण 3,44,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी कमी प्रतीच्या जर्द्यात रासायनिक पदार्थ मिसळून नामांकित कंपनीच्या नावाने पॅकिंग करून विक्री करत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी अर्धापुर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 196/2026 नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष काळे करत आहेत.



दरम्यान, 12 एप्रिल रोजी देगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोने कुषावाडी शिवारात रंजित इंगोले यांच्या शेतातील खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पथकाने छापा टाकला. यामध्ये 8 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून 36,340 रुपये रोख, 8 मोबाईल फोन व 7 मोटारसायकली असा एकूण 3,93,340 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 181/2026 महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12(अ) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक महाजन मैसनवाड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.


या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 7,37,790 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धाडीत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह प्रदीप खानसोळे, संजीव जिकलवाड, गणेश धुमाळ व कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. या उल्लेखनीय कारवाईबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकाचे कौतुक करून अभिनंदन केले आहे. तसेच नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती ‘खबर’ हेल्पलाईन (9150100100) वर गोपनीयपणे द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
