संकटात महिलांना आधार देणारे ‘सखी वन स्टॉप सेंटर’ ठरतंय जीवनदायी केंद्र

नांदेड| महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर पीडितांना तातडीची व सर्वसमावेशक मदत मिळावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेले ‘सखी वन स्टॉप सेंटर’ हे नांदेडमध्ये महिलांसाठी सुरक्षित आधारस्थान ठरत आहे. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय आणि राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे केंद्र कार्यरत आहे.

या केंद्राच्या माध्यमातून अत्याचारग्रस्त महिलांना कायदेशीर सल्ला, वैद्यकीय मदत, समुपदेशन तसेच सामाजिक व कौटुंबिक आधार एकाच छताखाली उपलब्ध करून दिला जातो. विशेष म्हणजे, गरजूंना तात्पुरत्या निवाऱ्याची सुविधाही येथे दिली जाते.

महात्मा फुले मार्केटजवळील महिला व बालविकास भवनात सुरू असलेले हे केंद्र २४ तास कार्यरत असून, अनेक महिलांना संकटातून बाहेर पडण्यासाठी याचा मोठा लाभ होत आहे. कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचार, मानवी तस्करी किंवा आर्थिक शोषण अशा विविध प्रकारच्या प्रकरणांमध्ये या केंद्राकडून तातडीने मदत पुरवली जाते.

याशिवाय, १८१ महिला हेल्पलाईनद्वारेही महिलांना २४ तास सहाय्य मिळत आहे. कोणतीही अडचण किंवा अत्याचाराची घटना घडल्यास महिलांनी त्वरित या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. महिलांना सुरक्षितता, आत्मविश्वास आणि नव्याने उभं राहण्याची संधी देणारे हे केंद्र समाजासाठी एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!