डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत साजरी करा; पोलीस निरीक्षक चिंचोलकरांचे आवाहन

नवीन नांदेड | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात पण शांततेत साजरी करत पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी केले. ग्रामीण पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समिती बैठकीत ते बोलत होते.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे, अग्निशमन दलाचे अधिकारी, परिवहन विभाग, महापालिका, महावितरणचे अधिकारी तसेच जयंती मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीनिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी दक्ष राहावे, असेही त्यांनी सांगितले.

डीजे मुक्त जयंतीचा संदेश
जयंती साजरी करताना डीजे टाळून पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम घेण्यावर भर द्यावा, असेही चिंचोलकर यांनी स्पष्ट केले. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश लक्षात ठेवत समाजाने एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रशासनाची समन्वय बैठक
10 एप्रिल रोजी झालेल्या या बैठकीत विविध विभागांमधील समन्वयावर भर देण्यात आला. जयंती दरम्यान वाहतूक, सुरक्षा, वीज व इतर सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित विभागांनी तयारी केली असल्याची माहिती देण्यात आली. या बैठकीस जयंती मंडळ पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तसेच ग्रामीण व शहरी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top