नांदेड शहरात कॉम्बिंग ऑपरेशन; 4 दिवसांत 88 पेक्षा अधिक सराईत गुन्हेगारांवर कारवाई

नांदेड| शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत मोठे कॉम्बिंग ऑपरेशन राबवत सलग चार दिवसांत 88 पेक्षा अधिक सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली 9 एप्रिल रोजी रात्री 11 ते 10 एप्रिल पहाटे 3 वाजेपर्यंत विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा तसेच शहरातील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

या ऑपरेशनदरम्यान चोरी, शरीराविरुद्धचे गुन्हे, अवैध शस्त्र बाळगणारे, तडीपार आरोपी, हिस्ट्रीशीटर व सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई करत अनेक आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.

6 ते 10 एप्रिल दरम्यान राबवलेल्या मोहिमेत: एकूण 76 आरोपींवर कारवाई, 67 गुन्हे दाखल, तडीपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 6 जणांवर गुन्हे, मपोका कलम 55 अंतर्गत 13, तर 56/57 अंतर्गत 30 जणांची तपासणी
तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांच्या या आक्रमक कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. पुढील काळातही अशा प्रकारच्या मोहिमा सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!