’स्वरमेघ’च्या ’तेरे सुर और मेरे गीत’ कार्यक्रमाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद

नांदेड (प्रतिनिधी) येथील प्रसिद्ध गायिका मेघा संजीवन यांच्या स्वरमेघ म्युझिक कल्चर’च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तेरे सूर और मेरे गीत या कार्यक्रमास रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

’स्वरमेघ म्युझिक कल्चर’च्या वतीने येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात ’तेरे सुर और मेरे गीत’ या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेड परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, शिवसेना आमदार हेमंत पाटील, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण आदींची उपस्थिती होती. संयोजक इंजि. संजीवन गायकवाड व सौ. नंदा गायकवाड, मुख्य गायिका मेघा संजीवन, संपादक/ गायक केशव घोणसे पाटील, जयचंद्र तत्तापुरे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.

अजरामर गायक लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्यासह दिवंगत सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना समर्पित या कार्यक्रमात मो. रफी, लता मंगेशकर यांच्यासह किशोरकुमार, आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह विविध गायकांनी गायलेली गीते सादर करण्यात आली.

नांदेडच्या शास्त्रीय आणि सुगम संगीतातील प्रसिद्ध गायिका मेघा संजीवन यांच्यासह, सलग 16 तास मो. रफी यांची गीतं गाण्याचा विश्वविक्रम करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नाव नोंदवलेले मुंबईतील प्रसिद्ध गायक संतोष कपारे, दैनिक ’गोदातीर समाचार’चे संपादक केशव घोणसे पाटील, इंजि. जयचंद्र तत्तापुरे, सावजी दुमाने, मयूर सावजी यांनी विविध गीतं सादर केली.

गायिका मेघा संजीवनच्या सुरांची बरसातः विविधांगी गीतं ः गायिका मेघा संजीवन हिने श्याम तेरी बन्सी, एक राधा एक मीरा, भोर भई पनघट पे अशा श्रवणीय भक्तिगीतांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यांनी छुप गए सारे नजारे, तुमसे ओ हसीना, पलकों के पीछे से, बदरा छाये, दिल तेरा दीवाना है सनम, के आजा तेरी याद आयी, अजहुन आये बालमा यांसारखी गाणी गायली. त्यांनी तब्बल 20 विविध प्रकारची गाणी सादर केली आणि प्रेक्षकांच्या टाळ्या जिंकल्या.

संतोष कपारेंनी रसिकांना थिरकवले ः आपल्या जोशपूर्ण गायनासाठी ओळखले जाणारे मुंबईचे गायक संतोष कपारे यांनी जोशपूर्ण गीतं सादर केली. त्यांच्या या गीतांवर प्रेक्षक अक्षरशः थिरकले. प्रेक्षकांमध्ये जाऊन गाताना त्यांनी प्रेक्षकांना थिरकवले.

केशव घोणसे पाटील यांनी ’ओ साथी रे’ या भावस्पर्शी गीतासह वादीयाँ मेरा दामन हे सोलो गीतं तसेच मेघा संजीवन यांच्या साथीने कार्यक्रमाच्या सुरुवातीला छुप गाये सारे नजारे आणि तुमसे ओ हसीना अशी सलग दोन जोशपूर्ण युगल गीतं, त्याचबरोबर मेघा संजीवन आणि संतोष कपारे यांच्या साथीने चल कही दूर निकल जाए’ हे ट्रायो (तीन गायकांनी) गीत सादर करून रसिकांची दाद मिळवली. इंजि. जयचंद्र तत्तापुरे यांनीही सोलो तसेच युगल गीतं सादर केली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबईचे प्रसिद्ध निवेदक (आरजे) नासिर खान यांनी केले. खास अशा म्युझिशियन टीमने या कार्यक्रमात बहार आणली. अरविंद उपाध्याय (नागपूर), किरण यादव (मुंबई), चंद्रशेखर सावंत (मुंबई) यांच्यासह रतन चित्ते, चेतन चित्ते, शुद्धोधन कदम, स्वप्निल धुळे, किशोर आवटे आणि हंसराज चित्ते या अनुभवी तसेच तरुण वादकांनी कार्यक्रमाला संगीताची साथसंगत दिली.

या कार्यक्रमात विविध वाद्य खास आकर्षण ठरले. ज्यात सॅक्सोफोन, बासरी, गिटार यासह विविध वाद्यांचा समावेश होता. यापूर्वी च्या स्वरमेघ म्युझीक कल्चरने सादर केलेल्या पाचही यशस्वी कार्यक्रमानंतर याही कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद देत या सांगितीक मेजवानीचा आनंद घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top