हिमायतनगरमध्ये गुन्हेगारी वाढ; CCTV बसवण्याची मागणी, ‘मुस्लिम युवा टायगर सेना’ आक्रमक

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्य चौका-चौकांमध्ये तात्काळ CCTV कॅमेरे बसवावेत, अशी ठाम मागणी ऑल इंडिया मुस्लिम युवा टायगर सेना तर्फे करण्यात आली आहे. या मागणीसाठी संघटना आक्रमक झाल्याचे चित्र आहे.

या संदर्भात मराठवाडा प्रदेश अध्यक्ष शेख खय्युम भाई खुरेशी आणि जिल्हाध्यक्ष शेख मुजम्मिल यांच्या नेतृत्वाखाली हिमायतनगर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री ताडेवाड, नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब तसेच पोलीस निरीक्षक अमोल भगत यांना निवेदन देण्यात आले.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “शहरात गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. CCTV कॅमेरे बसविल्यास पोलिसांना तपासासाठी ठोस तांत्रिक पुरावे मिळतील. त्यामुळे खऱ्या गुन्हेगारांची ओळख पटेल आणि निर्दोष नागरिकांवर अन्याय होणार नाही.”

मुख्यत्वे उमर चौक, आंबेडकर चौक आणि मुख्य बाजारपेठ यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी कॅमेरे बसवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, प्रशासनाने या मागणीची तात्काळ दखल घेऊन निधी मंजूर करावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा देत भविष्यात आमरण उपोषण छेडण्याचा इशाराही संघटनेचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष शेख खय्युम भाई खुरेशी आणि जिल्हाध्यक्ष शेख मुजम्मिल यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!