नांदेड (प्रतिनिधी) अनैतिक मानवी व्यापारावर आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांनी मोठी कारवाई करत रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुंटनखाण्यावर छापा टाकला. या कारवाईत सहा पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच ६ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी बिलोली श्याम सुदाम पानेगावकर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, नर्सी ते शंकर रोडवरील राजवार बार अॅण्ड रेस्टॉरंट येथे देहविक्रीचा व्यवसाय सुरू आहे. या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून पडताळणी केली.


माहितीची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी पंचासमक्ष छापा टाकला असता, बारच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. या ठिकाणाहून संतोष श्रीपत पवळे (वय ३०) व शिवराज श्रीपत पवळे (वय ३५, दोघेही रा. बालाजीनगर) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी सोहेल शेख (रा. पनवेल, मुंबई) हा महिलांना पुरवठा करत असल्याचे सांगितले, तर सदर जागेचे मालक श्रीपत आनंदराव पवळे असल्याचे उघड झाले.

पोलिसांनी घटनास्थळावरून ४७,५०० रुपये रोख, ६०,००० रुपयांचे मोबाईल फोन आणि MH-12SY-6411 क्रमांकाचे वाहन (किंमत सुमारे ५ लाख) असा एकूण ६,०७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईदरम्यान सहा पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील मदत व पुनर्वसनासाठी संबंधित संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले आहे. या प्रकरणी रामतिर्थ पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार (PITA) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
या धाडसी कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी कौतुक केले असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील, असा इशारा दिला आहे.




