एमएच-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू; 100 मीटर परिसरात कडक निर्बंध

नांदेड| राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएच-सीईटी परीक्षा-२०२६ पार्श्वभूमीवर नांदेड शहरातील परीक्षा केंद्र परिसरात कडक प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. परीक्षेचे वातावरण शांत, सुरक्षित आणि पारदर्शक राहावे यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत हे आदेश जारी केले आहेत.

एमबीए/एमएमएस तसेच अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, बी. प्लॅनिंग आणि कृषी तंत्रज्ञान अभ्यास-क्रमांसाठी एमएच-सीईटी परीक्षा नांदेड शहरात दोन टप्प्यांत आयोजित करण्यात आली आहे. पहिला टप्पा ६ ते २६ एप्रिल २०२६, तर दुसरा टप्पा ९ ते १९ मे २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.४५ या वेळेत पार पडणार आहे.

तीन परीक्षा केंद्रांवर निर्बंध – नांदेडमधील तीन परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात हे आदेश लागू असतील , ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, शासकीय तंत्रनिकेतन, श्री संभाजी कॉलेज ऑफ प्रायमरी

काय आहेत निर्बंध? – निर्दिष्ट कालावधीत परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात खालील बाबींवर पूर्ण बंदी राहणार आहे: परीक्षार्थी व अधिकृत कर्मचारी यांच्याशिवाय इतर कोणालाही प्रवेश नाही, कॅलक्युलेटर, लॅपटॉप, रेडिओ, ट्रान्झिस्टर यांसारखी इलेक्ट्रॉनिक साधने बाळगण्यास मनाई, सार्वजनिक दूरध्वनी, STD/ISD बूथ, फॅक्स, झेरॉक्स, पेजर आदी सेवा बंद ठेवणे, ध्वनीक्षेपक (लाउडस्पीकर) वापरण्यास सक्त मनाई, हे निर्बंध दररोज सकाळी ६ ते सायंकाळी ७ या वेळेत लागू राहतील.

परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार, गोंधळ किंवा गैरप्रकार घडू नये तसेच परीक्षार्थ्यांना शांत व सुरक्षित वातावरण मिळावे हा या आदेशांचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थी, पालक व नागरिकांनी या आदेशांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!