तीर्थक्षेत्र बोरगडीला ‘गट ब’ दर्जासाठी प्रयत्न करणार – आमदार बाबुराव कदम कोहळीकर

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| विदर्भ-मराठवाडा -तेलंगणा राज्यात प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यतील हिमायतनगर तालुक्याच्या बोरगडी येथे श्री हनुमान जन्मोत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या पावन पर्वानिमित्त आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी बोरगडी येथील हनुमान मंदिरात उपस्थित होऊन मारोतीरायाचे दर्शन घेतले. प्रभू श्रीरामाचे परमभक्त आणि शक्ती-युक्तीचे प्रतीक असलेल्या मारुतीरायांच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी मतदार संघातील सर्व जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.


 
यावेळी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. हनुमान जन्मोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा आणि अखंड हरीनाम सप्ताह सोहळ्यामुळे वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले होते. मंदिर कमेटीच्या वतीने आमदारांचा स्वागत व सन्मान करण्यात आला. या प्रसंगी बोलताना आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर तीर्थक्षेत्र बोरगडीच्या नावाची भव्य कमान उभारण्यात येईल तसेच बोरगडीला ‘गट ब’ दर्जा मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कीर्तनकार गणेश महाराज कोल्हारीकर, ह.भ.प. माधव महाराज बोरगडीकर, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, विधानसभा संघटक विजय वळसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी हजारो महिला-पुरुष भाविक भक्त आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.“ज्यांच्या हृदयात प्रभू श्रीराम वसतात, ज्यांच्या स्मरणाने संकटे दूर पळतात…” अशा शब्दांत आमदारांनी सर्वांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. “जय श्रीराम, जय हनुमान”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!