दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्याची मागणी तीव्र

नांदेड | मंत्रालय मुंबई येथील दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी करण्यात आलेली बदली रद्द करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. सकल दिव्यांग संघटना, नांदेडच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात निवेदन देत तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, ही बदली नियमबाह्य असून लाखो दिव्यांगांवर अन्याय करणारी आहे. तुकाराम मुंढे हे कर्तव्यदक्ष व भ्रष्टाचारविरोधी अधिकारी असून त्यांनी दिव्यांग कल्याण विभागात सुरू असलेल्या गैरप्रकारांवर आळा घालण्याचे काम अल्पावधीतच सुरू केले होते.

दिव्यांग योजनांच्या नावाखाली काही बोगस लाभार्थी, बनावट कर्मचारी व संस्थांच्या माध्यमातून शासनाच्या निधीची लूट सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केल्यामुळेच काही संस्थाचालक व प्रभावशाली व्यक्तींनी दबाव टाकून त्यांची बदली घडवून आणल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री सचिवालयासमोर ठिय्या आंदोलन करत निवेदन सादर केले. तुकाराम मुंढे यांना नियमानुसार किमान तीन वर्षे त्याच पदावर कायम ठेवण्यात यावे, जेणेकरून दिव्यांग योजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल, अशी मागणी करण्यात आली आहे.

संघटनेने पुढे म्हटले आहे की, शासन दिव्यांगांसाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवत असले तरी त्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पूर्णपणे पोहोचत नाही. तुकाराम मुंढे यांनी अल्प कालावधीतच या योजनांमधील भ्रष्टाचारावर लगाम घालत बोगस प्रकरणांवर धडक कारवाई सुरू केली होती.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी याबाबत तात्काळ निर्णय घेऊन बदली रद्द करावी, अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

या वेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल साळवे, मिलिंद सितळे, माधव हिवराळे, शिवराज बंगरवार, आतिख हुसेन, कार्तिक कुमार भरतिपुरम, सय्यद आरिफ, नागनाथ कामजळगे, आरूष साळवे, हसन खान इस्माईल खान, रमेश लंकाढाई, मोहम्मद मोहसीन कादरी, नारायण ताडलवार, मोहम्मद सोफियान, मोहम्मद मोहसीन, शेख आलीम, मोहम्मद अब्दुल माजीद रज्जाक बागवान, साईनाथ काळे, महंमद शकिल अहमद, जफर खान, संतोष रामशेटवार, संभाजी सुपारे, दिगांबर सोनटक्के आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!