नांदेड रेल्वे विभागाची कामगिरी उजळली; वेळेचे पालन व प्रवासी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा

नांदेड | दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत नांदेड विभागाच्या संचालन (ऑपरेटिंग) विभागाने आर्थिक वर्ष २०२५–२६ मध्ये वेळेचे काटेकोर पालन, कार्यक्षम संचालन आणि प्रवासी सुविधांमध्ये लक्षणीय प्रगती साधली आहे. विभागाने गाड्यांची वेळ अचूक ठेवणे, वहन क्षमता वाढवणे आणि प्रवाशांच्या सोयी सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबवले.

वेळेच्या अचूकतेत मोठी झेप
या वर्षात मेल/एक्सप्रेस गाड्यांनी तब्बल ३९ वेळा १०० टक्के समयपालन साध्य केले, तर मागील वर्षी ही संख्या केवळ ४ होती. प्रवासी गाड्यांनी ४८ दिवस १०० टक्के समयपालन नोंदविले, जे मागील वर्षी २३ दिवस होते. तसेच मेल/एक्सप्रेस व प्रवासी गाड्यांनी मिळून १२ दिवस १०० टक्के समयपालन साध्य केले, जे मागील वर्षी फक्त १ दिवस होते.

वेगवाढीमुळे सेवा अधिक विश्वासार्ह
संचालन कार्यक्षमता वाढविण्यासाठी ३८६ किलोमीटर मार्गावर गाड्यांचा वेग १०० किमी प्रतितासवरून ११० किमी प्रतितासपर्यंत वाढविण्यात आला आहे. यामुळे गाड्यांचा प्रवास अधिक जलद आणि वेळेत पूर्ण होऊ लागला आहे.

प्रवासी सुविधांसाठी विविध उपक्रम
प्रवाशांच्या सोयीसाठी नांदेड विभागाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. वंदे भारत एक्सप्रेस सेवा २६ ऑगस्ट २०२५ पासून नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) पर्यंत विस्तारित करण्यात आली असून, यामुळे प्रवाशांना जलद व आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. सणासुदीच्या काळातील गर्दी लक्षात घेऊन २०२५–२६ दरम्यान ‘ट्रेन ऑन डिमांड’ (TOD) अंतर्गत २,४४१ विशेष फेऱ्या चालविण्यात आल्या. तसेच प्रवासी भार कमी करण्यासाठी २३३ अतिरिक्त डबे जोडण्यात आले. याशिवाय १३ जोड्या गाड्यांमध्ये ५५ डब्यांची कायमस्वरूपी वाढ, तर ३ जोड्या गाड्यांमध्ये १५ डबे तात्पुरते वाढविण्यात आले.

नवीन गाड्यांची भर – नांदेड विभागातून खालील नवीन गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत :
नांदेड – फिरोजपूर साप्ताहिक एक्सप्रेस (१५ जून २०२५ पासून)
काचेगुडा – भगत की कोठी – काचेगुडा एक्सप्रेस (नांदेड मार्गे) (२० जुलै २०२५ पासून)
तिरुपती – साईनगर शिर्डी – तिरुपती एक्सप्रेस (नांदेड मार्गे) (१४ डिसेंबर २०२५ पासून)
ही सर्व कामगिरी नांदेड विभागातील संचालन विभाग व कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे साध्य झाली असून, सेवा गुणवत्ता, संचालन कार्यक्षमता आणि प्रवासी समाधान वाढविण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरले आहे, अशी माहिती जनसंपर्क विभाग, नांदेड यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!