सोनारी फाटा अपघातप्रवण; स्पीड ब्रेकरअभावी वाढते अपघातांचे प्रमाण
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड–आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा हा अपघातप्रवण ठिकाण ठरत असून, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या दुर्लक्षामुळे येथे वारंवार अपघात होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.


या ठिकाणी हदगावकडे जाणारा रस्ता तसेच वाळकेवाडी गावाकडे आणि नांदेड–किनवट महामार्गाचा संगम असल्याने चौरस्ता असून, वाहतुकीची मोठी वर्दळ होत असते. मात्र, या ठिकाणी सर्वच बाजूला स्पीड ब्रेकर नसल्यामुळे वाहनांचा वेग नियंत्रणात राहत नसून अपघातांची मालिका सुरूच आहे.


दि. ३१ मार्चच्या रात्री भरधाव वेगातील चारचाकी आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन गंभीर अपघात झाला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिक श्रीदत्त पाटील सोनारीकर व इतर नागरिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. तरीही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


सोनारी फाटा हा अत्यंत वर्दळीचा ‘टिप पॉईंट तथा चौरस्ता’ असल्याने येथे चारही बाजूंनी स्पीड ब्रेकर बसविणे, सूचना फलक लावणे व वाहतूक नियंत्रणाची योग्य व्यवस्था करणे अत्यावश्यक असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे. भविष्यातील संभाव्य अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.



