महाराष्ट्र

150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा मोहिमेत नांदेड परिक्षेत्र अव्वल

उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते गौरव

नांदेड, अनिल मादसवार| राज्यात राबविण्यात आलेल्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात नांदेड पोलिस परिक्षेत्राने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या भरीव कामगिरीबद्दल पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमाप यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविले. यावेळी नांदेड परिक्षेत्रात राबविण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहितीही सादर करण्यात आली.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या या मोहिमेत प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान व जनतेसाठी सुलभ करण्यावर भर देण्यात आला होता. नांदेड परिक्षेत्राने यामध्ये पुढाकार घेत ‘सरकार पोर्टल’, ई-ऑफिस प्रणाली, डेटा डॅशबोर्ड, सोशल मीडिया एकत्रीकरण, तसेच नागरिकांच्या तक्रारींच्या जलद निवारणासाठी प्रभावी यंत्रणा उभारली.

याशिवाय ‘Eagle Eye’ प्रणालीद्वारे गुन्हेगारीवर नियंत्रण, हेल्पलाईन सुविधा आणि तक्रार निवारणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला. या उपक्रमांमुळे नागरिकांचा प्रशासनावर विश्वास अधिक दृढ झाला आहे.

या कार्यक्रमाचे मूल्यमापन पोलीस महासंचालक कार्यालय तसेच भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) यांच्या माध्यमातून करण्यात आले. अंतिम टप्प्यात नांदेड परिक्षेत्राने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.

या यशामागे परिक्षेत्रातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एकत्रित प्रयत्न कारणीभूत असल्याचे सांगत उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले. नांदेड परिक्षेत्राच्या या यशामुळे राज्यभरातून कौतुक होत असून प्रशासनातील डिजिटल परिवर्तनाचे हे आदर्श उदाहरण मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!