ऑपरेशन ‘क्रॅकडाऊन’ अंतर्गत मोठी कारवाई; १५.९८ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
नांदेड (प्रतिनिधी) नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने “ऑपरेशन क्रॅकडाऊन” अंतर्गत मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधीत जर्दा असा तब्बल १५ लाख ९८ हजार ४२९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे व त्यांच्या पथकाने ही धडक मोहीम राबवली.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेला नांदेड शहरातील चुनाभट्टी परिसरात एका घरात मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी चुनाभट्टी येथील पोल्ट्रीफॉर्म मागील घरावर छापा टाकला...
