मराठी राजभाषेची सरकारी कार्यालयातच विटंबना; ‘शासकीय’चे ‘नासकीय’!
जिल्हाधिकारी कार्यालयाने मागविला खुलासा; बिलोली SDO कार्यालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
नांदेड, गोविंद मुंडकर| मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिच्या संवर्धनासाठी शासन विविध उपक्रम राबवत असताना, नांदेड जिल्ह्यातील एका शासकीय कार्यालयानेच मराठी भाषेची उघडपणे विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिलोली येथील उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयातून एका तक्रारदाराला पाठविण्यात आलेल्या अधिकृत पत्रात "शासकीय" ऐवजी "नासकीय" असा उल्लेख करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधितांकडून खुलासा मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
विशेष म्हणजे, ही केवळ टंकलेखनाची साधी चूक नसून, अधिकृत पत्रव्यवहारातील निष्काळजीपणा, बेफिकिरी आणि प्रशासनातील ढिसाळपणाचे जिवंत उदाहरण असल्याची टीका होत आहे. संबंधित पत्रात केवळ "शासकीय" शब्दाची मोड...
