वीरशैव लिंगायत धर्माला स्वतंत्र मान्यतेसाठी प्रयत्न; उदगीरच्या बैठकीत पुढील रणनीती ठरणार
नांदेड | वीरशैव लिंगायत समाजाला देशातील सातवा स्वतंत्र धर्म म्हणून संविधानिक मान्यता मिळावी, यासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केदारपीठाचे जगद्गुरू रावल विद्याविभूषित श्री श्री श्री १००८ भीमाशंकरलिंग महास्वामीजी यांनी दिली. या संदर्भात उदगीर येथे २ ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीत अंतिम भूमिका निश्चित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळ पाठविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
नांदेडमधील आनंदनगर परिसरातील श्री केदारेश्वर सत्संग भवन येथे आयोजित व्यापक बैठकीत ते धर्मोपदेश करताना बोलत होते. या बैठकीस महाराष्ट्र व तेलंगणातील २५ हून अधिक मठाधिपती, भाजपचे कंधार तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे, पक्षाचे प्रवक्ते संतोष पांडागळे तसेच वीरशैव लिंगायत समाजातील मान्यवर उपस्थित होते.
जगद्गुरूंनी सांगितले की, वीरशैव लिंगायत सम...
