विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करूया : कुलगुरू डॉ. मनोहर चासकर
प्राचार्यांसमवेत आढावा बैठक; शैक्षणिक व प्रशासकीय अडचणी सोडविण्यास प्राधान्य
नांदेड | विद्यार्थ्यांचे सर्वांगीण हित हेच विद्यापीठाचे सर्वोच्च प्राधान्य असून, विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रभावी समन्वय निर्माण करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले.
विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात सोमवारी (१३ जुलै) आयोजित महाविद्यालयांच्या प्रशासकीय व शैक्षणिक अडचणींच्या आढावा बैठकीत प्राचार्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सूर्यकांत जोगदंड, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, मानव्य विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग खडके, परी...
