एसबीआयच्या लॉकरमधून ८० तोळे सोने गायब; ग्राहकांचा विश्वास तुटला
नांदेडच्या डॉक्टर लेन शाखेत धक्कादायक घोटाळा; एक अधिकारी अटकेत, दुसरा फरार
नांदेड | देशातील सर्वात विश्वासार्ह बँकांपैकी एक मानल्या जाणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नांदेड येथील डॉक्टर लेन शाखेत ग्राहकांचा विश्वास डळमळीत करणारा मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. कर्जासाठी तारण ठेवलेले तब्बल ८० तोळे सोने दोन बँक अधिकाऱ्यांनी संगनमताने लंपास केल्याचा आरोप समोर आला असून, या घटनेने ग्राहकांसह शहरात एकच खळबळ उडाली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, हा प्रकार लपवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लॉकर मधील खरे सोने काढून त्याजागी बनावट सोने ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. यामुळे बँकेच्या सुरक्षाव्यवस्थेवर आणि अंतर्गत नियंत्रणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर लेन शाखेत कर्जासाठी तारण ठेवण्यात आलेल्या सोन्यापैकी ८ ग्राहकांचे ३९१.६० ग्रॅम सोने...
