मृग नक्षत्र सुरू, तरीही पावसाची प्रतीक्षा कायम; हिमायतनगर तालुक्यात शेतकरी चिंतेत
पेरणीसाठी शेतकरी सज्ज, मात्र वरुणराजाच्या आगमनाकडे लागल्या नजरा
हिमायतनगर, अनिल मादसवार| मृग नक्षत्राची सुरुवात होऊन तब्बल सात दिवस उलटून गेले असतानाही हिमायतनगर शहरासह तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा दिवसेंदिवस मावळताना दिसत असून, वरुणराजाच्या कृपादृष्टीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीतील मशागतीची सर्व कामे पूर्ण केली असून, बियाणे व खतांची खरेदीही करून ठेवली आहे. अनेक शेतकरी पेरणीसाठी पूर्णपणे सज्ज झाले असले, तरी पावसाने अद्याप हजेरी न लावल्याने पेरणी रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरवर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पावसाची दमदार सुरुवात होत असते. मात्र यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, आकाशाकडे डोळे लावून बस...
