मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ३२ वा वर्धापन दिन उत्साहात
हिमायतनगर (प्रतिनिधी) येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ३२ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्रेरणास्थान हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वरिष्ठ महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा. एम. पी. गुंडाळे, कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक प्रा. रणखांब, उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. कांगणे, प्रा. दिवडे व प्रा. पाटील यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्मे, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
...
