अमरनाथ गुहेतून – भाग ११ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)
“जय माता दी”च्या जयघोषात… कटऱ्यापासून भवनापर्यंत श्रद्धेची अविस्मरणीय चढाई! - रात्रभराच्या प्रवासानंतर शरीराला विश्रांतीची गरज होती, पण मनाला मात्र झोप कुठे होती? कारण आजचा दिवस होता जगप्रसिद्ध माता वैष्णोदेवीच्या दर्शनाचा! बहुतेक हे माझे 31 वे माताराणी चे दर्शन असावे. बाबा बर्फानींच्या पवित्र गुहेत नतमस्तक झाल्यानंतर आता त्रिकूट पर्वतावर विराजमान असलेल्या जगन्मातेच्या चरणी माथा टेकविण्याचा योग आमच्या संपूर्ण परिवाराला लाभणार होता. पहाटे चार वाजताच हॉटेल ग्रँड शरणमध्ये प्रत्येक खोलीत हालचाल सुरू झाली. कुणी खोलीतील केटलमध्ये चहा बनवत होते, कुणी गरम पाण्याने स्नान करून तयार होत होते, तर कुणी एकमेकांच्या दरवाजावर टकटक करून, “चला… वेळ झाली!” अशी हाक देत होते. नऊ दिवसांपासून एकत्र राहिलेल्या या शंभर जणांच्या परिवारात आता औपचारिकतेचा लवलेशही उरला नव्हता. कोणाचे औषध कोणाकडे आहे, कोणाचा मोबाईल चार...
