नांदेडात पद्मशाली समाज कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न
६ सप्टेंबरला राज्यस्तरीय उप वधू-वर परिचय मेळाव्याची घोषणा; नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप
नांदेड, प्रतिनिधी| अखिल भारतीय पद्मशाली संघम, हैदराबाद संलग्नित मराठवाडा पद्मशाली महासभेअंतर्गत नांदेड जिल्हा पद्मशाली समाज संघटनेच्या प्रौढ, युवक व महिला संघटनेचा कार्यकारिणी विस्तार व प्रबोधन मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. भर उन्हाची व उकाड्याची तमा न बाळगता जिल्हाभरातून समाजबांधव, महिला व युवकांनी विक्रमी उपस्थिती लावत समाज एकजुटीचे प्रभावी दर्शन घडविले.
या मेळाव्यात समाजाच्या संघटनात्मक बळकटीसह शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रगतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी समाजबांधव व पालकांच्या मागणीचा आदर करत येत्या रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता मातोश्री मंगल कार्यालय, कौठा (नांदेड) येथे राज्यस्तरीय उप वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची अध...
