पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे रखडली; नागरिकांत नाराजी
नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आरोप, तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरातील विविध प्रभागांतील नाल्या तुडुंब भरलेल्या अवस्थेत असून पावसाळ्यापूर्वी होणारी नालेसफाईची कामे अद्यापही पूर्ण झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाल्यांमध्ये साचलेल्या घाणीमुळे पावसाचे पाणी घरांमध्ये शिरून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी गेल्या आठ दिवसांपासून नगरपंचायत प्रशासनाकडे नालेसफाईची मागणी लावून धरली आहे. मात्र काही ठिकाणी केवळ थातूरमातूर कामे करून चालढकल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या नाल्यांचे बांधकामही अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांक...
