डीजेचा दणदणाट नाही; टाळ-मृदंगाच्या गजरात बाप्पाला निरोप
हिमायतनगरचा गणेशोत्सव ठरला आदर्श; भक्ती, परंपरा अन् शिस्तीचा जागर — शांततेत विसर्जन
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| डीजेचा दणदणाट नाही, ध्वनिप्रदूषणाचा गोंगाट नाही... टाळ-मृदंगाचा निनाद, भजन-अभंगांचा गजर, फुलांची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात हिमायतनगर शहरातील गणरायाला यंदा भावपूर्ण निरोप देण्यात आला. शासन व पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत गणेश मंडळांनी डीजेला फाटा देत वारकरी परंपरेला प्राधान्य दिल्याने विसर्जन मिरवणुकीत भक्ती आणि संस्कृतीचे दर्शन घडले.
शुक्रवारी सुरू झालेली प्रमुख गणेश मंडळांची मिरवणूक अनंत चतुर्दशीचा मुहूर्त उशिरा असल्याने शनिवारी सकाळपर्यंत सुरू होती. सकाळी साडेसात वाजता प्रमुख गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात भजनी मंडळांनी अभंग व भक्तिगीते सादर केली. फुलांची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गणेशभक्तांनी बाप्पाला निरोप दिला....
