जन्मतारखेच्या कागदासाठी वृद्धांची फरपट; पेन्शनच्या हक्कालाच कागदपत्रांचा फास!
६०-७० वर्षे जगलेल्या निराधारांकडे जन्मदाखला कुठून येणार? श्रावणबाळ योजनेतील नव्या अटीने लाभार्थी हैराण
देगलूर, गंगाधर मठवाले| आयुष्याची उमेदीची वर्षे कष्टात घालवून आता शासनाच्या आधारावर जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसमोर पेन्शन मिळविण्यासाठी जन्मतारखेचा पुरावा सादर करण्याचे नवे संकट उभे ठाकले आहे. ग्रामीण भागातील अनेक वृद्धांच्या जन्माची नोंदच उपलब्ध नसताना जन्म प्रमाणपत्र किंवा जुने शैक्षणिक दस्तऐवज सादर करण्याची अट घालण्यात आल्याने निराधार लाभार्थ्यांची अक्षरशः फरपट सुरू झाली आहे.
गरीब, निराधार, वयोवृद्ध आणि गरजू नागरिकांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसह विविध सामाजिक सुरक्षा योजना राबविल्या जातात. मात्र, या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करताना लाभार्थ्यांची दमछाक होत आहे. योजनेचा लाभ मिळविण्यापेक्षा कागदपत्रे जमविणेच मोठे आव्हान ठर...
