शेतकऱ्यांसाठी वाहून घेतलेला चळवळी योद्धा: गुणवंत पाटील
शेतकऱ्याच्या हाताला घट्टे असतात; पण त्याच्या मनात स्वाभिमानाचा कणखर कणा असतो. मातीशी नाते सांगणारा हा माणूस कधी आभाळाकडे पाहून पावसाची वाट पाहतो, तर कधी बाजारपेठेकडे पाहून आपल्या घामाला योग्य किंमत मिळण्याची अपेक्षा करतो. मात्र, त्या घामाची किंमत ठरविण्याचा अधिकार त्याच्याच हातात असावा, शेतकरी हा दयेचा नव्हे तर स्वाभिमानाचा विषय आहे आणि शेती करणारा माणूस आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाला पाहिजे.या विचारासाठी आयुष्याची अनेक दशके झोकून देणारी काही माणसे महाराष्ट्राच्या शेतकरी चळवळीच्या इतिहासात कायमची नोंदली गेली आहेत.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हंगरगा या गावच्या मातीतून पुढे आलेले आणि नांदेडला स्थायिक झालेले गुणवंत पाटील हंगरगेकर हे त्यापैकी एक महत्त्वाचे नाव.त्यांची ओळख केवळ ‘शेतकरी संघटनेचे नेते’ एवढीच नाही. शेतकरी चळवळीच्या विचारविश्वाशी निष्ठा राखत, आंदोलनाच्या रस्त्यावर उतरून, ...
