सोयाबीन उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांचा अभ्यासदौरा; कापूस संशोधन केंद्रात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
नांदेड | सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा-2026 अंतर्गत पीक उत्पादनवाढ आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने श्री पंचमुखी शेतकरी गट, कासारखेडा आणि अन्नपूर्णा महिला शेतकरी गट, सिद्धनाथ यांच्या सदस्यांनी नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राला भेट देत सोयाबीन पिकातील अत्याधुनिक तंत्रज्ञान व शास्त्रशुद्ध व्यवस्थापनाबाबत सखोल मार्गदर्शन घेतले.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, पाणी फाउंडेशन आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात शेतकऱ्यांना सोयाबीन पीक स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या विविध मानक कार्यपद्धती (SOP) आणि उत्पादनवाढीच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे, डॉ. बसवराज भेदे, डॉ. पवन ढोके, प्रगतशील शेतकरी गुलाब पावडे, सहाय्यक कृषी अधिकारी तथा मेंटॉर वसंत जारिकोटे आणि कैलास पेरके यांची प्रमुख उपस्थिती होती.
...
