अनुसूचित जाती उपवर्गीकरणासाठी १३ सप्टेंबरला नांदेडमध्ये जनआक्रोश महामोर्चा
मातंग समाजासह लाभवंचित जातींचा सहभाग; जिल्ह्यातील जनसंवाद बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड| अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून आरक्षणाचा लाभ सर्व घटकांपर्यंत समतोलपणे पोहोचवावा, या मागणीसाठी १३ सप्टेंबर २०२६ रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश महामोर्चा काढण्यात येणार आहे. लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून सकाळी ११ वाजता महामोर्चाला सुरुवात होणार असून, मातंग समाजासह अनुसूचित जातीतील लाभवंचित समाजघटक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजन समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी महत्त्वपूर्ण निर्णय देत राज्यांना त्यांच्या अधिकारक्षेत्रात उपवर्गीकरणाचा मार्ग खुला केला आहे. त्यानंतर विविध राज्यांनी याबाबत निर्णय घेतला असताना महाराष्ट्रात अद्याप उपवर्गीक...
