हिमायतनगरात अतिक्रमण हटाव मोहिमेची धडक कारवाई
रस्ते झाले मोकळे... पण अनेकांच्या चुली विझण्याची भीती!
हिमायतनगर, प्रतिनिधी| हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणाविरोधात नगरपंचायत प्रशासनाने सोमवारी (दि. ३ ऑगस्ट) पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करत शहरातील प्रमुख मार्ग अतिक्रमणमुक्त केले. या कारवाईमुळे वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला, नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. मात्र, दुसरीकडे हातावर पोट असलेल्या फेरीवाले, हातगाडे चालक आणि लहान व्यावसायिकांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
नगरपंचायतीकडे शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांची गैरसोय आणि अपघातांचा धोका वाढत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. त्यानुसार प्रशासनाने सुमारे सहा महिन्यांपूर्वी व्यापारी, फेरीवाले आणि हातगाडेधारकांना ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देऊन अतिक्रमण स्वखुशीने हटविण्याचे आवाहन केले होते. काहींना नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या...
