
नवीन नांदेड| सर्वाह इन्क्युबेशन फाउंडेशन आणि श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था (एस.जी.जी.एस. आय.ई.अँड टी.), नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वाहच्या तिसऱ्या स्थापना दिनानिमित्त आयोजित सर्वाह “व्हेंचर डेव्हलपमेंट प्रोग्राम (VDP) २०२६” अंतर्गत अंतिम फेरीतील स्टार्टअप संघांची घोषणा करण्यात आली. एस.जी.जी.एस.आय.ई. अँड टी. नांदेड च्या माजी विद्यार्थ्यांच्या (Alumni) सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून संस्थेमध्ये “नवोपक्रम, उद्योजकता आणि स्टार्टअप” संस्कृतीला चालना देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले.



या कार्यक्रमास एस.जी.जी. एस. आय.ई. अँड टी. च्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष श्री. प्रशांत पौळ तसेच बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे सदस्य व संस्थेचे माजी विद्यार्थी अमोल महामुनी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी सर्वाह इन्क्युबेशन फाउंडेशनचे अध्यक्ष व संचालकअभय देशपांडे, एस.जी.जी.एस.आय.ई. अँड टी.चे संचालक डॉ. मनेश कोकरे, इन्नोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस (IIL) विभागाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद भालेराव, सर्वाह इन्क्युबेशन फाउंडेशनचे प्रमुख योगेश तावडे तसेच एस.जी.जी.एस. माजी विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी श्री. दीपक बिसेन उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम, उद्योजकता आणि स्टार्टअप संस्कृतीला चालना देण्यासाठी सातत्याने सहकार्य करण्याची ग्वाही दिली.



सर्वाह व्हेंचर डेव्हलपमेंट प्रोग्राम २०२६ ला विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ३६ अर्ज प्राप्त झाले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), आरोग्य सेवा, कृषी, रोबोटिक्स, डीप-टेक, इलेक्ट्रिक मोबिलिटी, फिनटेक आणि एडटेक अशा विविध क्षेत्रांतील कल्पनांचे सादरीकरण करण्यात आले. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, ओरिएंटेशन सत्रे, पिचिंग कार्यशाळा आणि दोन टप्प्यांतील कठोर मूल्यांकन प्रक्रियेनंतर १० स्टार्टअप संघांमधील १७ नवोपक्रमकांची अंतिम निवड करण्यात आली.


अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या नवोपक्रमकांमध्ये ओंकार पाटील, अनिरुद्ध श्रीरामन, श्रीकांत इंगोले, मयूर खोडे, संकेत साळवे, गौरव आधे, यश म्हसागर, जयनीत भिंगारदेवे, अभय गाडे, जान्हवी रुद्रवार, उर्जित भावसार, धीरज वासू, शर्वरी वंजारी, यशराज काकडे, आदित्य निकम, यश राऊत आणि अथर्व पाटकी यांचा समावेश आहे.


निवड झालेल्या संघांचा यावेळी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. हे सर्व संघ आता सर्वाह इन्क्युबेशन फाउंडेशनच्या सहा महिन्यांच्या व्हेंचर डेव्हलपमेंट व इनोव्हेशन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कालावधीत त्यांना एक-ते-एक मार्गदर्शन (Mentorship), बिझनेस मॉडेल व्हॅलिडेशन, ग्राहक पडताळणी (Customer Discovery), प्रोटोटाइप व एमव्हीपी (MVP) विकासासाठी मार्गदर्शन, बौद्धिक संपदा (IP) सहाय्य, उद्योग तज्ज्ञांचे मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि इन्क्युबेशन सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
याशिवाय प्रत्येक निवड झालेल्या संघाला प्रोटोटाइप विकसित करण्यासाठी ₹५०,००० पर्यंत आर्थिक सहाय्य (निश्चित टप्पे व मूल्यमापनाच्या अधीन) देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्टार्टअप्सना शासकीय अनुदान योजना, एंजल गुंतवणूकदार, संस्थात्मक निधी संस्था तसेच पुढील गुंतवणुकीच्या संधींशी जोडले जाणार असून त्यांच्या व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक सहकार्य केले जाणार आहे.यावेळी बोलताना संस्थेचे संचालक डॉ. मानेश कोकरे यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये उद्योजकतेची मानसिकता विकसित करण्याची गरज अधोरेखित करत सर्वाहच्या उपक्रमाचे कौतुक केले.
योगेश तावडे यांनी सर्वाह इन्क्युबेशन फाउंडेशनचा आतापर्यंतचा प्रवास, व्हेंचर डेव्हलपमेंट प्रोग्रामची वैशिष्ट्ये आणि पुढील सहा महिन्यांचा रोडमॅप सादर केला. श्री. अभय देशपांडे यांनी एसजीजीएस आयईअँडटी मध्ये जागतिक दर्जाची नवोपक्रम आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्याचा सर्वाहचा संकल्प व्यक्त केला. तर दीपक बिसेन यांनी एसजीजीएस माजी विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यार्थ्यांना आणि नवउद्योजकांना सातत्याने पाठबळ देण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाची सांगता अंतिम निकाल जाहीर करणे, प्रमाणपत्र वितरण आणि स्टार्टअप आयडिया शोकेस यांसह झाली. यावेळी निवड झालेल्या संघांनी बोर्ड ऑफ गव्हर्नर्स,माजी विद्यार्थी, प्राध्यापक, उद्योग तज्ज्ञ आणि स्टार्टअप परिसंस्थेतील मान्यवरांशी संवाद साधला.
या उपक्रमामुळे सर्वाह इन्क्युबेशन फाउंडेशन हे नाविन्यपूर्ण कल्पनांना यशस्वी स्टार्टअपमध्ये रूपांतरित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले असून एसजीजीएसआयईअँडटी, नांदेड हे नवोपक्रम आणि उद्योजकतेचे सक्षम केंद्र म्हणून अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
